मंगळवार, २६ जानेवारी, २०१०

महाराष्ट्रा पुढच्या समस्या

आज भारत प्रजासत्ताक होवुन ६० वर्ष झाली आहेत आणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होवुन ५० वर्ष होत आली आहेत. तरीही ज्या समस्या राज्य निर्मीतीच्या वेळेला होत्या त्याच समस्या कमी अधिक प्रमाणात आज हि तश्याच आहेत. त्याच समस्यांबद्दल मला आज माझे मत मांडायचे आहे.

१. भ्रष्टाचार -

२२०० वर्षा पुर्वी आर्य चाणक्य यांनी त्यांच्या कोटिल्य अर्थशास्त्रामधे लिहिले आहे, "ज्या प्रकारे तळ्यातील मासे पाणी कधी पितात ते कळत नाही त्याच प्रकारे सरकारी अधिकारी पैसे कधी खातात ते कळत नाही". आज २२०० वर्षा नंतर ही वाक्य जसेच्या तसे लागु पडतं. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे.

सरकारी अधिकारी त्यांच्या पगाराला हात तरी लावत असतील का? इतके पैसे ते भ्रष्टाचारातुन कमवत आहेत. पण या अधिकारांन्या पैसे कोण देतं तर आपण सामान्य माणुसच न. आपल्यालाच आपली कामे नियमबाह्य प्रकारे, तातडीने करुन घेयाची असतात त्यामुळे या अधिकारांच्या हात 'ओले' करायला मागे पुढे पाहत नाही. जर देणारा देत आहे तर घेणारा मागे का राहिल?

आपण जपानचे कॉतुक करतो कारण तिथला वेटर टिप घेत नाही म्हणुन, किती देशाचा अभिमान बाळगतात ते लोक वैगरे पण आपल्या देशात आल्या बरोबर आपण काय करतो. हल्ली तर केस कापणार्‍याला पण टिप द्यावी लागते. सुरवात हिथुनच होत आहे. आज ज्याचे वय ३-४ वर्ष आहे तो जर बघेल की त्याचे वडिल केस कापणार्‍याला टिप देत आहेत, रस्त्यावर सिग्नल तोडला म्हणुन पोलीस हवालदाराला टिप देत आहेत तर त्याच्या कडुन मोठा झाल्यावर काय अपेक्षा ठेवणार. रस्त्यावरच्या हवालदाराला टिप देण्यापेक्षा आपणच जर वाहतुकीचे नियम पाळले तर. परदेशात आपण बरोबर लाइन न कापता वाहन चालवणार पण इथे आल्यावर लाइन तोडायची स्पर्धा लावणार याला काय म्हणायचे. जर आपणच दुसर्यांना पैसे खाण्याची संधी निर्माण करत असु तर ते का नाही खाणार.

२. शिक्षण -

राज्याचे शैक्षणीक धोरण काय तर शिक्षणमंत्र्याची मर्जी. शिक्षणमंत्री बदला की धोरण बदले. आज काय ४ थी पर्यंत परीक्षा नाहीत, उद्या १ ली पासुन म्रराठी सक्तीची अगदीच काही नाही मिळाले तर घाला ११ वीच्या प्रवेशाचे गोंधळ. हे असे शैक्षणीक धोरण असु शकतं का?

लहान मुलाला ज्युनियर केजी मधे प्रवेशासाठी काय काय उपद्वयाप करायला लागतात ते ऐकली की मन अगदी सुन्न होवुन जाते. २-३ वर्षाच्या मुलाल काय काय भयानक प्रश्न विचारले जातात? त्याच्या आई वडिलांची टेस्ट घेतली जाते, त्यांचे शिक्षण पाहीले जाते. जर आई वडिलांच्या शिक्षणावर मुलांची अ‍ॅडमिशन ठरणार असतील तर ज्यांचे गरिबीमुळे किंवा इतर कारणामुळे शिक्षण होवु शकले नाही त्यांच्या मुलांनी काय करायचे?

९० च्या दशकामधे ११ वीच्या प्रवेशासाठी केंद्रिय बोर्डाच्या मुलांना ५% वाढवुन मिळायचे का तर त्यांचा अभ्यासक्रम असा होता की ते राज्याच्या शालेय बोर्डापेक्षा कठिण होता त्यामुळे त्यांना हे ग्रेस मार्क मिळायचे. आज बघा काय चालु आहे ते शालेय बोर्डाच्या मुलांवर ग्रेस मार्क घेयाची वेळ आली आहे. गेल्या १०-१५ वर्षा मधे जो आमुलाग्र बदल केंद्रिय पातळीवर होवु शकले ते बदल पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्रमधे का नाही होवु शकले? मान्य आहे की जी सुविधा मुंबई, पुण्याच्या मुलाला मिळते ती सुविधा राज्याच्या ग्रामीण भागात नाही मिळु शकत पण त्या साठी पुढचे १०० वर्ष जो अभ्यासक्रम आजोबांनी शिकला तोच नातु पण शिकणार का? आज १०वीत असलेल्या मुलाला आपल्याला कोणत्या नियामानुसार प्रवेश मिळणार आहे ते त्याला माहित नाही. किती मार्कस मिळवायचे हे त्याला उमगत नाही आहे याला जबाबदार कोण?

डिम्ड विद्यापिठ म्हणजे राजकारणी लोकाचे पैसे खाण्याचे हक्कच्या ठिकाणांन पैकी एक. हि सर्व विद्यापिठ या राजकारणी लोंकांच्या हातात एकटवली आहेत. मागच्या आठवड्यात केंद्रीय पातळीवर निर्णय झाला की या विद्यापिठांची मान्यता रद्द करायची. चांगला निर्णय आहे (सुप्रिम कॉर्टाने नेहमी प्रमाणे त्याला स्थगीती दिली आहे तो भाग वेगळा. मला एक गोष्ट कधिच कळत नाही या सुप्रिम कॉर्टामधे इतकी अपिल पडुन असतात त्यांचा कधि निकाल लागत नाही पण संजय दत्तला जामीन, विद्यापिठांची स्थगीती यांचे निर्णय कसे लवकर लागतात असो) पण जर सरकारला जर या विद्यापिठांची मान्यता रद्द करयाची होती तर याच सरकार मधिल अर्जुन सिंग यांनी ती दिली कशाला? सरकारला माहीत नव्हते का कि कुराण कोणाची आहेत? काल ज्यांची होती त्यांचीच ती आज हि आहेत मग हा निर्णय का झाला? याचे गोडबंगाल काय आहे?

३. उर्जा -

महाराष्ट्रामधील सर्वात मोठा विनोद काय असेल तर वीज. नरेंद्र दाभोळकरांनी खरेतर लोडशेडिंगचे अचुक वेळापत्रक सांगणार्‍याला ज्योतीष म्हणुन घोषित करावे असे माझे मत आहे. सरकारचे वेळापत्रक आणि खरी लोडशेडिंगची वेळ यात साम्य कुठेच नाही आहे. पण लोडशेडिंगची वेळ आली आहे सरकारच्या धरसोड वृती मुळे आणी योग्य नियोजनचा अभाव. सरकार कडे नक्की किती वीजेची गरज आहे याची आकडेवारी आहे पण ती उपलब्ध कशी करायची याचे नियोजनच नाही आहे. माझे ठाम मत आहे की हि लोडशेडिंग सरकारने या इनव्हर्टर बनवणार्‍या कंपनीच्या फायद्यासाठी केली आहे. १८-१८ तास वीज नसुन सुद्दा वीजेचे बिल तितकेच कसे येवु शकते.

२००७ मधे उर्जामंत्री दिलिप वळसे पाटील म्हणत होते की २००९ पर्यंत महाराष्ट्रा लोडशेडिंग मुक्त करणार, २००९ मधे तेच मंत्री म्हणतात की २०१२ पर्यंत करणार. याच वरुन समजुन जायाचे की सरकार वेळ काढत आहे. बरे सरकार कडे इच्छाशक्ती तरी आहे का? तर ते ही नाही. कारण २०१२ पर्यंत जरी लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र करायचा म्हट्ला तर आज वीजनिर्मितीची प्रक्रिया सुरु झाली पाहीजे होती. ते तर कुठेच दिसत नाही आहे.

दाभोळ वीज प्रकल्पाचे तीन तेरा या राजकारणी लोकांनी कसे वाजवले ते तर सर्वांच माहीत आहे. स्वताचा हिस्सा नाही मिळाला म्हणुन युती शासनाने त्याला अरबी समुद्रामधे बुडवला आणी नंतर तुकारामांच्या गाथा निघाल्या तश्या या प्रकल्पाला समुद्रामधुन बाहेर काढला. पण यात नुकसान कोणाचे झाले. राज्याचेच न. त्या दिवसापासुन आज पर्यंत या राज्यामधे किती विदेशी प्रकल्प आले. एक ही नाही. कारण जो घोळ आपण दाभोळ वीज प्रकल्पामधे घातला त्याचा एक वाईट मेसेज गेला की महाराष्ट्र हे गुंतवणी करण्या योग्य राज्य नाही आहे.

४. से़झ -

रायगड मधील लोकांना सेझ नको असताना ही सेझ राबवण्यात येत आहे. सरकार नक्की कोणाचे आहे. जनतेचे की अंबानीचे? एक छोटसं उदाहरण सांगतो त्या वरुन समजुन येइल सरकार कोणाचे आहे ते.

मागच्या वर्षी न्हावा शेवा लिंक जोडण्यासाठी टेंडर मागवले होते. यात इतर टेडंर बरोबर अनिल अंबानीचे कोरियन कंपनी बरोबर आणि मुकेश अंबानीचे ही टेंडर होते. हि लिंक मुळे जो पट्टा जोडला जाणार होता तो आहे मुकेश अंबानीच्या सेझचा. थोडक्यात काय या लिंक वरुन सर्वात जास्त मुकेश अंबानीच्या मालाच्या गाडयांची ये जा होणार होती.

ही लिंक नेहमीप्रमाणे बांधा, वापरा, ह्स्तांतर करा या तत्त्वावर बांधण्यात येत होती. अनिल अंबानीने टेंडर भरताना दाखवले होते की या लिंकचा खर्च ते ७ वर्षा मधे टोल वसुल करुन पुरा करतील. तर तेच मुकेशने दाखवले की खर्च वसुल करण्यासाठी (टोल लावुन) त्यांना ७५ वर्ष लागतील. इतीक मोठी तफावत होती या दोन टेंडर मधे. हे कसे काय शक्य तर, अनिल अंबानी स्वताची दुश्मनी काढण्यासाठी इतका भरमसाठ टोल आकरणार होता की त्यांचा खर्च ७ वर्षामधे भरुन निघाला असता. अगदी याच्या उलटे मुकेश करणार होते. जेनेकरुन मालाची किमंत कमी होवुन त्यांच्या मालाल बाजारात उठाव मिळेल. शेवटी काय झाले तर अनिल अंबानींचे टेडर पास होवुन सुद्दा अश्या काही चाव्या फिरल्याकी सरकारने अनिल अंबानींचे टेडर रद्द करुन स्वताच तो प्रकल्प हातात घेतला आहे. या वरुन काय ते समजा.

मुकेश अंबानी म्हणे योग्य भाव देवुन जमीनी खरेदी करत आहेत. पण जो शेतकरी काळ्या मातीला आई समजतो तो शेतकरी जमीन विकायला तयार नाही आहे तरी हे सरकारी अधिकारी धाकटपाशा दाखवुन ती जमीन लुबाडत आहे. हा सेझ प्रकल्प घरटी एकाला नोकरी देणार आहे. अरे पण घरात २-३ भाउ असतील आणि एकालाच नोकरी दिली तर इतर भावांनी काय करायचे. शेती करुन जे सर्वांचे भागत होते ते सुद्दा सरकारी आशिर्वादाने खेचुन घेतले जात आहे. जो याला विरोध करेल त्याच्या वर पोलिस नको नको ती कलमे लावुन जेल मधे पाठवत आहेत.

आता हे प्रकरण सुप्रिम कॉर्टापुढे गेले आहे. बघु काय होते ते.

५. शेतकरी आत्महत्या -

महाराष्ट्रामधील सर्वात ज्वलंत समस्या कोणती असेल तर ती हिच आहे. निर्सगापासुन सावकरांन पर्यंत प्रत्येक जण शेतकरील्या आत्महत्येचा वाटेवर ढकलत आहे. आधिच्या पिकाला घेतलेले कर्ज कसे फेडायचे याच्या विंवचनेत असताना दुसर्या लागवडी साठी पैसे कोठुन आणायचे हि समस्या उभी राहते. (स्वताच्याच पक्षातील) सावकारांना कोपरा पासुन ढोपरा पर्यंत सोलायची भाषा बोलणारे आबा शेतकर्यांना स्वस्ता मधे आणी सुलभ प्रकारे कर्ज कसे उभे राहील हे बघत नाहीत.

शेतमाला चांगला भाव मिळत नाही. किती भाव मिळेल याची भविष्यवाणी न करता शरद पवार आज कोणाचे भाव वाढणार उद्या कोणाचे भाव वाढणार याची भविष्यवाणी करत आहेत. (आज पर्यंत साखरेचे आणि दुधाचे भाव वाढले आणी हे दोन पिक राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जातात तो पश्चिम महाराष्ट्राच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हे कसे काय बुवा)

आज उसाला चांगला भाव मिळाला तर जास्तीत जास्त शेतकरी पुढच्या वर्षी त्याचेच पिक घेतात हे काय सरकारला माहीत नाही आहे का? मग सरकार त्या मालाला आधिच रास्त भाव का नाही देत. शेतमालाची किंमत तर ठरवायाची पण खरेदी चालु करयाची २-३ महिन्यानंतर हि चापलुसी कशासाठी.

६. लोंढे -

इतर राज्य स्वताच्या मुख्यमंत्रांचे पुतळे उभे करत बसणार आणि महाराष्ट्र त्यांच्या लोकाना पोसत बसणार. राज्यघटने मधे काही लिहिले असो पण एका घरात कोणी किती राहायचे याला मर्यादा आहे की नाही. मुलभुत सोयिसुविधांवर ताण पडत आहे. पण सरकारला मतांशिवाय काहीच दिसत नाही आहे.

समस्या तर खुप आहेत. या समस्यांवर उत्तर सुद्दा आहेत. पण समस्या सोडवण्यासाठी लागणारा खंबीरपणा या राज्यकरत्यांमधे नाही आहे तो कोठुन आणायचा?

रविवार, २४ जानेवारी, २०१०

महाराष्ट्राच्या मानबिंदुची अवस्था

काही दिवसांपुर्वी पुण्यनगरीला जाण्याचा योग आला. मित्र परिवारांना कचकचुन भेटता आल्यामुळे खुपच आनंद झाला होता. चितळ्यांची भाकरवडी, मनाली मधे जेवण यांनी पोट अगदी तृप्त झाले होते.

पण

या सर्वांनवर विरजण पडले ते महाराष्ट्राच्या मानबिंदुची म्हणजे शनिवारवाडयाची अवस्था बघुन. मन अगदी हेलावुन गेले. असे वाटत होते की आताच शनिवारवाड्यातुन बाहेर पडावे आणि ज्यांनी त्याची मानखंडना केली आहे त्यांचे डोके मेखसुन मारुन फोडावे.

ज्या शनिवारवाड्यात देशाचे राजकारण ठरायचे त्याची काय हि भयाण अवस्था? पानीपतचे स्वार ज्या दरवाजामधुन बाहेर पडले त्या दरवाजा मधुन आज वासनेचे प्रेमवीर आत घुसतात. ५-५ रुपयाची तिकिटे घेवुन आपण काय बघतो तर वासनेमधे आकंठ बुडालेल्या प्रेमविरांचे चाळे जे आपल्याला दिसतात पण ना शनिवारवाड्याच्या रखवालदारांना दिसत नाहीत ना स्वयंघोषीत संस्कृती रक्षाकांना.

आपल्या कडे इतिहासची कदरच केली जात नाही. पण त्याच वेळेला आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे जो स्वताचा इतिहास विसरला तो काय इतिहास घडवणार.

१९ व्या शतकात इंग्रजांनी शनिवारवाड्याचे लोकांच्या मनातील असलेले स्थान पुसण्यासाठी शनिवारवाडयाला आग लावुन दिली आणी ती आग चांगली १५ दिवस धुमसत ठेवु दिली. आज जी शनिवारवाड्याची भग्नअवस्था झाली आहे ती त्या आगीमुळे.

पण आपले सरकार सुद्दा काही करत नाही आहे. सरकारने मनात आणले तर तसाच्या तसा शनिवारवाडा उभा राहु शकतो पण सरकारला करायचे नाही आहे. शनिवारवाड्याचा विकास म्हणजे SRA ची योजना नाही ज्यात सरकारला मलिदा मिळेल त्या मुळे सरकार काही करणार नाही.

इतर देशातील जावुदे आपल्याच देशातील जयपुर मधील राजवाडे जसेच्या तसे राहु शकतात तर आपल्या महाराष्ट्रामधील औतिहासिक स्थाने योग्य प्रकारे का नाही राहु शकत. सरकारबरोबर आपली हि जबाबदारी आहे. आपल्या पुर्वजाचा अमुल्य ठेवा जपायची. ती सर्वांनी पार पाडलीच पाहीजे.

इतिहासप्रेमी यात लक्ष घालु शकतील का? माझ्या परिने जितके होवु शकेल तितकी मदत मी करेन. पण शनिवारवाडा वाचवा हो.

(या लेखा मधे फोटो डकवुन मला माझ्या मानबिंदुची अवेहलना करयाची नाही आहे त्यामुळे इथे फोटो देत नाही आहे.)

शनिवार, २३ जानेवारी, २०१०

माझी आवडती पुस्तके - भाग १

वाचाल तर वाचाल असे कोणी तर म्हणुन ठेवलेच आहे. कदाचीत मी माझ्या खुप लहानपणीच हे वाक्य ऐकले असावे म्हणुन लहानपणा पासुन आज पर्यंत मी पुस्तके वाचत सुटलो आहे (अभ्यासाची नव्हे, गोष्टी, कांदबंरी, अनुवादीत, आत्मचरित्र)

कोणाला ललित लेखन आवडतं, तर कोणाला आत्मचरित्र. पण आपणास बुवा अनुवादीत पुस्तके जाम आवडतात. किती वेगवेगळे विषय हाताळलेले असतात या परदेशी लेखकांनी मारीयो पुझोचा गॉडफादर, रॉबीन कुकची मेडिकल वरची पुस्तके, मायकल क्रायटनची विज्ञानाच्या पुढची पुस्तके, डॅन ब्राउनची ख्रिश्चन संस्थाच्या कल्पीत गुपीतांवरची पुस्तके. ही सर्व पुस्तके मला भयंकर आवडतात.

या लेखमालेतुन मला आज याच पुस्तकांन बद्दल बॉल्गायचे आहे.

माझे अतिशय लाडके पुस्तक म्हणजे मारियो पुझोचे' द गॉडफादर.'


माझ्या मते तरी या जगातील सार्वकालीक बेस्ट पुस्तक हेच असु शकतं. हे पुस्तक वाचताना आपण ते वाचत नाही तर आपोआप आपल्या समोर त्या पुस्तकातील व्यक्तीरेखा जिवंत होवुन आपण त्या चित्रपट पाहिल्या सारख्या त्या बघत राहतो.

हे पुस्तक पब्लिश झाल्यानंतर मारियो पुझोवर तो माफियाचा माणुस असल्याचा आरोप झाल होता कारण माफिया जगाचे सखोल वर्णन तोच करु शकतो जो त्यांच्यात राहिला आहे. पण या गोष्टिंचे खंडन करताना मारियोने सांगितले कि त्याच्या आजुबाजुला जे घडत होते त्याचे वर्णन त्याने पुस्ताका मधे केले आहे. या पुस्तकाचा प्रभाव त्या काळातील डॉन लोकांवर ही पड्ला असे बोलले जात होते.


माफिया जग आणि त्यांचे व्यवहार कसे चालतात याचे उत्तम वर्णन खचितच इतर कोणत्या पुस्तका मधे मिळेल. रुढ अर्थाने या पुस्तकाचा नायक आहे गॉडफादर व्हिटो कोर्लीयानेचा तिसरा मुलगा मायकेल कोर्लीयाने. जो त्याच्या फॅमीलीच्या व्यवसायापासुन दुर असतो. पण त्याच्या वडीलांवर म्हणजे गॉडफादर व्हिटो वर प्रतीस्पर्धी हल्ल करतात तेव्हा त्याला त्याच्या कुटुंबासाठी पुढे व्हावेच लागते.

या पुस्तकावर हॉलीवुड मधे १९७१-७२ मधे द गॉडफादर पिक्चर येवुन गेला. मार्लन र्बंडो, अल पचीनोच्या अभिनयाने तो पिक्चर सजला होता. पण एक ल़क्षात ठेवा पुस्तक वाचल्या शिवाय पिक्चर पाहु नका. नाहीतर आधि पिक्चर बघाल आणि मग पुस्तक वाचायला जाल तर भ्रमनिरास होईल.

The Godfather QUOTES :-

1. "I'm gonna make him an offer he can't refuse." - The Godfather Vito

2. So the next day, my father went to see him; only this time with Luca Brasi. An' within an hour, he signed a release, for a certified check for $1000. [Kay: "How'd he do that?"] My father made him an offer he couldn't refuse. [Kay: "What was that?"] Luca Brasi held a gun to his head and my father assured him that either his brains, or his signature, would be on the contract. That's a true story. That's my family, Kay, it's not me."- Michael and Kay conversing

3. Leave the gun. Take the cannoli." -Clemenza to Rocco

4. But I'm a superstitious man. And if some unlucky accident should befall him - If he should get shot in the head by a police officer, or if he should hang himself in his jail cell - or if he's struck by a bolt of lightning, them I'm going to blame some of the people in this room, and that I do not forgive. But, that aside, let me say that I swear, on the souls of my grandchildren, that I will not be the one to break the peace we've made here today." -Don Corleone to the other Dons

(वरिल वाक्य या पुस्ताकामधुन घेतली आहेत)




शनिवार, १६ जानेवारी, २०१०

जगातील खरी आश्वर्य

मानवाने आकाशात झेप घेतली, चंद्रावर पाऊल ठेवले, गुरुवर, सुर्यावर अवकाश यान धाडले या सर्व ग्रह, तार्‍यांबद्दल माहीती मिळावली.
पण
जेव्हा त्याने स्वताच्या भुत़काळात डोकावुन पाहीले तेव्हा त्याच्या चेहरा तोंडात मारल्या सारखा झाला. कारण एकच सुर्य, चंद्रच्या नादात स्वताच्या ग्रहाकडे लक्ष दिलेच नाही. आधुनीक काळातील मानवाला एकच घमेंड आहे ती म्हणजे तो त्याच्या पुर्वांजा पेक्षा अधिक प्रगत आहे. पण मेक्सिको मधील पालेन्क मधील माया लोकांच्या पिरॅमीड मधील अग्नीबाण्, जगातील प्राचीन चित्रांमधील अंतराळवीर, पेरु देशातील एका दगडावर ह्र्दय बदलण्याचे चित्र, सुमेरियन लोकांची १५ आकडी संख्या जी आजच्या कंम्पुटरवर ही दिसत नाही. अश्या बर्‍याच घटना बघुन तो जागीच थिजुन गेला.

खरोखर जे आपल्या पुर्वजांनी लिहुन ठेवले आहे, चित्रकाम करुन ठेवले आहे त्या बद्दल आपल्याला जास्त काहीच माहीती मिळत नाही, नाही कोणी त्याबद्दल बोलत. आंतरजालावर शोधत असताना अश्याच काही गोष्टी मला सापडल्या त्याच गोष्टींबद्दल आज मला ब्लॉगायचे आहे.

१. पिरीरीसचा नकाशा.

१५१३ मधे तुर्कस्तान मधे 'पिरीरीस' नावाचा एक अ‍ॅडमिरील होता. त्याने जगाचा एक नकाशा बनवला. तो नकाशा दोन भागात हरणाच्या कातड्यांवर वेगवेगळ्या रंगानी बनवला आहे. हा नकाशा १९२९ मधे सापडला. पण खुप लोकांना तो नकाशा चुकिचा वाटत होता. तेव्हा श्री. मॅलरी (अमेरीकन तज्ञ) यांनी अमेरीकन आरमाराच्या वॉल्टर्स यांची मदत घेवुन उपग्रहांद्वारे कॅरोच्या खुप उंची वरुन फोटो घेवुन पाहीले तर त्यांना धक्काच बसला. कारण त्या नकाशा मधे दाखवण्यात आलेली खंडाची टोके थोडी खेचल्यासारखी, निमुळती होती आणि कॅरो वरुन घेतलेल्या फोटोशी हा नकाशा तंतोतंत जुळत होता. १५१३ मधे जेव्हा कोलंबसला नुकताच अमेरीकेचा शोध लागला होता त्या काळाच्या नकाशा मधे अमेरीका दाखावली होती. विमानाच्या सहाय्याने बनवला नकाशा १५१३ मधे बनवलेल्या नकाशाशी कसा काय तंतोतंत जुळला? पिरीरीसने हा नकाशा कोणत्या उपकरणांच्या सहाय्याने काढला? आज ही या आणि इतर प्रश्नांची उत्तर कोणी देवु शकले नाही आहेत.

२. नाझका लाईन्स


दक्षिण अमेरीकेतील पेरु देशात अँडीज पर्वतांमधे एका कड्यावर त्रिशुळ खोदला आहे. या त्रिशुळाच्या दिशेने गेलो तर पर्वतावर नाझकाचे पठार आहे. त्या पठारावर मैलोपर्यंत सरळ रेषा आहेत. काही समांतर तर काही एकमेकींना छेद देत आहेत. या रेषांनाच इंकाचे रस्ते ही म्हणतात. कारण इथे पुर्वी इंका जमातीमधील लोक रहात होते. हे रस्ते इतके लांब लचक आहेत कि आकाशातुन पाहीले तर असे वाटते की जणु फार मोठा विमानतळच आहे.

३. बोलिव्हिया मधील सुर्यमंदिर




दक्षिण अमेरीके मधील बोलिव्हिया देशातील टियाहुन्को शहरामधे भग्नावस्थेमधे एक सुर्यमंदिर आहे. त्या मंदिराचे द्वारच ९.८ फुट उंच आणि १३ फुट लांब आहे. आश्वर्याची गोष्ट अशी की हे द्वार १० टनाच्या एकाच दगडामधे कोरले आहे. प्राचीन काळामधे हे कसे शक्य आहे? याच शहरात एक २० टन वजनाची आणि २४ फुट उंच मुर्ती सापडली आहे. या मुर्तीवर असंख्य चिन्हे आणी चित्रे आहेत ज्यांचा आज पर्यंत अर्थ लागला नाही आहे.

४. इस्टर आयलंड


याच शहरामधील पठारावर गेलो तर आपण पाहु शकतो की १०० टन वजनाच्य दगडावर ६० टन वजनाचे दगड रचुन भिंती बनवल्या आहेत. या भिंतींमधेच अनेक दगडी चेहरे कोरुन काढले आहेत. या शहरामधे त्या पुतळ्यांना 'मोई' म्हणतात. हे पुतळे इथे कसे आले? कोणी इतके अजस्त्र पुतळे बनवले याचे उत्तर अजुन सापडायचे आहे.

५. पिरॅमिड

इजिप्त मधील पिरॅमिड सर्वांनाच माहीत आहेत. पण इतके अजस्त्र दगड तिथे कसे आले याचा विचार कोणी केला आहे का? आज संपुर्ण वाळवंट असलेल्या इजिप्त मधे इतके मोठे दगड कसे एका ठिकाणाहुन दुसरी कडे नेले असतील? वाळवंट आजच्या काळातील आहे की प्राचीन काळापासुन आहे? या अजस्त्र दगडामधे रस्ते, भुयार कोणी खोदुन काढले? सुपरिचीत खुफुच्या पिरॅमिडला १००० दशलक्षांनी गुणले तर पृथ्वी आणि सुर्याचे अंतर समजुन येतं. पिरॅमिड बांधण्यासाठी हजारो लोक लागले असतील तर त्यांच्या निवासाची, जेवणाची सोय कशी केली गेली?

६. माया संस्कृती

अतिशय प्रगत मानली गेलेल्या संस्कृती पैकी एक असलेल्या माया संस्कृती बद्दल फारसे काहीच समजु शकले नाही आहे. कारण स्पैनीश लोकांच्या आक्रमणामधे त्यांचे बरेच ग्रंथ नष्ट केले गेले. जे थोडे फार हाताशी आहे त्यात एक त्यांचे कॅलेन्डर, काही चित्रे. या सर्वात इतक्या चिन्हांची आणि खुणांची रेलचेल आहे की प्रत्येक जण स्वताच्य समजुती प्रमाणे अर्थ काढत आहे. मायालोक २० पर्यंत अंकगणिताचा वापर करत होते.

मोहेंजोदाडो आणी हरप्पा संस्कृती बद्दल पण तेच कोणी ही या लोकांच्या चिन्हांचा अर्थ लावु शकले नाहीत. उलट तिथे सापडलेल्या मृत शरीरामधे किरणॉस्तर्ग आढळुन आला आहे. हिरोशिमा आणि नागासाकी वर टाकल्यानंतर जितका किरणोस्तर्ग बाहेर पडला त्याहुन जास्त मोहेंजोदडो मधील मृत शरीरांमधे आढळला आहे. अतिप्राचीन काळात इतका किरणोस्तर्ग आला कोठुन?

७. प्राचीन भारत

पहिल्या अणुबॉम्बचे जनक जे. रोब्रट कोपनहेमर यांना विचारण्यात आले होते की, "जगातील पहिल्या अणुबॉम्बची निर्मीती करुन कसे वाटत आहे?" त्याचे त्यांनी ऊत्तर असे दिले की," जगातील पहिल्या नव्हे तर आधुनीक जगातील पहिल्या अणुबॉम्बची निर्मिती कारण जगातील पहिला अणुबॉम्ब प्राचीन भारता मधे वापरले गेले होते." इतक्या मोठा तज्ञ असे बोलत असेल तर त्या वर नक्कीच विश्वास ठेवायला पाहीजे. हे जर खरे असेल तर आपल्या पुर्वजांना हे ज्ञान कसे मिळाले? महाभारत युद्धा मधे वर्णली गेलेली शस्त्र ही अण्वस्त्रच होती हे आता जवळपास सर्वानाच मान्य आहे. इतके मोठे ज्ञान कोठुन मिळाले?

हाच खरा जागतिक वारसा आहे. जो आपण जपला पाहिजे.

रविवार, ३ जानेवारी, २०१०

हिरवी पाटी

मी कोणी मोठा लेखक नाही. कवी तर मुळीच नाही. माझ्या मनातले विचार मांडण्यासाठी हि धडपड.

आपल्या सर्वांच्या मनात असंख्य विचार येत असतात. माझ्या ही मनात येतात त्या विचारांना मुक्त वाव देण्याचा हा प्रयत्न आहे.

स्वताशी बोलत बसण्यापेक्षा तुमच्याशी बोलण्याचे ठरवले आहे.

आता मी सुद्दा बोलणार नव्हे ब्लॉगणार