सोमवार, २६ जुलै, २०१०

आद्यगुरू- वेदव्यास

व्यासरचित महाभारत भारतीय जीवनाशी अगदी एकरूप झाले आहे. एखादी कठोर प्रतिज्ञा ही भीष्मप्रतिज्ञा या नावाने ओळखली जाते तर उदार व्यक्तीला कर्णाची उपमा मिळते. एकाग्रतेचं उदाहरण द्यायचं झालं तर अर्जुन मापदंड ठरतो आणि कुठे मोठं भांडण सुरू असेल तर ‘काय महाभारत सुरू आहे’ असं सहजपणे म्हटलं जातं. दूरदर्शनवर महाभारत ही मालिका सुरू असताना साऱ्या भारतभर रस्त्यारस्त्यांतून कसा शुकशुकाट असायचा याची रसभरीत वर्णनं त्या वेळी वृत्तपत्रांतून येत असत. नाटय़-चित्रपटसृष्टीही या प्रभावांतून दूर राहू शकली नाही. महाभारतावर आधारित अनेक नाटकं किंवा ‘कलयुग’ आणि अगदी अलीकडला ‘राजनीती’ यांसारखे चित्रपटही आले. पण मला आठवतो तो न. चिं. केळकरांसारख्या विद्वान वाचकाच्या आयुष्यातला प्रसंग! त्यांना एकदा कुणीतरी विचारले, तुम्हाला दीर्घकाळापर्यंत विजनवासात राहावे लागले व त्या वेळी केवळ एकच ग्रंथ बरोबर नेता येणार असेल तर तुम्ही कोणता न्याल? क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उत्तर दिले होते, महाभारत.
व्यासांचे कुळ
व्यासांचे मूळ नाव कृष्ण द्वैपायन. वेद व पुराणांत सापडणाऱ्या वर्णनांवरून कश्यप, जमदग्नी, अत्री, गौतम, विश्वामित्र, भारद्वाज व वसिष्ठ या सप्तर्षीपैकी वसिष्ठांच्या कुळात व्यासांचा जन्म झाला. हे सर्व मंत्रद्रष्टे ऋषी आहेत. यांपैकी ऋग्वेदातील एक्काहत्तर मंत्र कश्यपांनी, एकोणऐंशी जमदग्नींनी, एकशेतीस अत्रींनी, दोनशे अकरा गौतमांनी, पाचशे एक विश्वामित्रांनी तर सर्वात जास्त म्हणजे आठशे अठ्ठेचाळीस मंत्र वसिष्ठांनी रचले. म्हणूनच वसिष्ठांचे स्थान या सर्वामध्ये वरचे आहे. अशा मंत्रकर्त्यां व ब्रह्मविद्या जाणणाऱ्या वसिष्ठांचा पुत्र शक्ती, शक्तीचा पुत्र पराशर व पराशर- मत्स्यगंधेचा पुत्र व्यास. पुढे विश्वमित्र- वसिष्ठ संघर्षांत विश्वामित्रांनी वसिष्ठांच्या सर्व पुत्रांना ठार केले. हे सर्व पुत्र वेदपारंगत व मंत्रद्रष्टे होते. पण त्यातील शक्तीला वसिष्ठांनी कुलपरंपरेने चालत आलेली ब्रह्मविद्या दिली होती. हा शक्तीही ठार झाल्यावर संपूर्ण ज्ञानाचा ऱ्हास झालासे पाहून वसिष्ठ बेचैन झाले व वेडय़ासारखे इतस्तत: भटकू लागले. ते असे भटकत असता त्यांची स्नुषा म्हणजे शक्तीची पत्नी त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्यामागून जाऊ लागली. अशा वेळी त्यांना वेदाध्ययनाचा ध्वनी ऐकू आला. त्या वेळी वेदपठण कोण करत आहे असे त्यांनी विचारले असता, भगवान शक्तीचा गर्भ मी धारण केला आहे व तोच हे उच्चारण करत आहे असे तिने सांगितल्यावर आपली कुलपरंपरा व ब्रह्मविद्यासंप्रदाय राखणारे कुलात कुणीतरी आहे हे पाहून वसिष्ठ निश्चिंत होऊन आश्रमात परत आले. गर्भातच हे वेदपठण करणारा मुलगा म्हणजे पराशर. आज उपलब्ध असलेल्या ऋग्वेदसंहितेत शक्तीचे नऊ तर पराशरांचे एकशे पाच मंत्र आहेत. थोडक्यात व्यासांचा जन्म केवळ मंत्रद्रष्टय़ा ऋषीकुलात झाला आहे असे नव्हे तर ब्रह्मविद्याप्रवर्तक कुलात झाला होता.
व्यासांचे कार्य
१. वेदांची विभागणी - ‘अनन्ता वै वेदा:’ म्हणजे वेद अनंत होते. वेदांच्या अनंतत्त्वाविषयी एक कथा तैत्तिरिय ब्राह्मणात आली आहे. पूर्वी वेद ही अति प्रचंड ज्ञानराशी होती. द्वापारयुगात ती संपूर्ण ज्ञानराशी जाणावी अशी महत्त्वाकांक्षा भारद्वाज ऋषींना झाली. त्यांनी घोर तपश्चर्या केली. प्रसन्न झालेल्या परमेश्वराने त्यांना वर मागण्यास सांगितले. भारद्वाजाने सर्व वेद मला प्राप्त व्हावा अशी इच्छा व्यक्त करताच अत्यंत प्रखर अशी ज्ञानराशी त्यांच्यासमोर प्रकट झाली. पण एवढे प्रचंड ज्ञान ग्रहण करणे अशक्यप्राय आहे असे म्हणून भारद्वाजांनी केवळ मूठभर ज्ञान ग्रहण केले. या कथेतून दोन गोष्टी लक्षात येतात-
एक म्हणजे प्रचंड अशा ज्ञानराशीचा अल्पभागच कलियुगात आपल्यापर्यंत आला होता आणि भारद्वाज ऋषींसारख्या विद्वान माणसालाही हे सर्वच्या सर्व ज्ञान ग्रहण करणे अशक्य होते तर सामान्य माणसाला ते कसे ग्रहण करता येणार? याचा परिणाम असा झाला की हे ज्ञान लुप्त होऊ लागले. वेद हे जसे धर्माचे मूळ आहे तसे ते ज्ञानाचेही मूळ असल्यामुळे ते जतन करणे गरजेचे होते. अशा वेळी या एका ज्ञानराशीची विभागणी व्यासांनी केली. विष्णुपुराणांत यासंबंधी एक श्लोक येतो-
द्वापारे द्वापारे विष्णुव्यासरूपे महामति:।
वेदमेकं स बहुधा कुरुते जगतो हितम्।।
(अर्थ- द्वापारयुगात एकच असलेल्या वेदाची विभागणी जगाच्या हितासाठी व्यासांनी केली.) त्यांनी ‘वेदान् विव्यास’ म्हणजे वेदांचे विभाजन केले त्यामुळे कृष्ण द्वैपायन हे ‘व्यास’ झाले. पण केवळ वेदांचे विभाजन होऊन चालणार नव्हते. या शुद्ध ज्ञानराशीचा प्रचार व प्रसार होण्याचीही गरज होती. त्यामुळे त्यांनी आपल्या एकेका शिष्याला एकेक वेद दिला. त्यांनी ऋग्वेद पैलाला, सामवेद जैमिनीला, यजुर्वेद वैशंपायनाला तर अथर्ववेद सुमंतूला देऊन त्यांना ही खंडित ज्ञानसरीता समाजात प्रवाहित करण्यास पाठवले.
२. महाभारत- व्यासांचे दुसरे महान कार्य म्हणजे महाभारताची निर्मिती. भारतीय जीवनशैलीचा आधारस्तंभ असणाऱ्या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाची महती सामान्यांना सांगायची तर केवळ रुक्ष तात्त्विक चर्चा करण्यापेक्षा कथेच्या अंगाने केली तर ती लवकर पचनी पडते म्हणून ‘जय’ हा पांडवांच्या जयाचा इतिहास व्यासांनी रचला. मूळ जय नामक भारत ८८०० श्लोकांचे आहे असे मानले जाते कारण आदिपर्वाच्या सुरुवातीला
अष्टौ श्लोकसहस्राणि अष्टौ श्लोकशतानि च।
अहं वेद्मि शुको वेति संजयो वेति वा न वा।। (आदि. १.८१)
(अर्थ- ८८०० श्लोक मी जाणतो. शुक जाणतो संजय जाणतो, अथवा जाणत नाही) असे व्यासांनीच लिहून ठेवले आहे. पण या संख्येविषयी विद्वानांत एकमत नाही.
काही विद्वानांच्या मते महाभारतातील कूटश्लोकांची संख्याच ८८०० इतकी आहे. असे असले तरी ब्रह्मविद्या जाणणारे व्यास व त्यांचा मुलगा शुक यांना हे कूटश्लोक माहिती असणं शक्य आहे पण व्यासांच्या आशीवार्दाने दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या संजयाला हे गहनश्लोक कळले असतील का, याविषयी शंकाच आहे. ८८०० ही कूटश्लोकांची संख्या असावी याला आणखी एक पुरावा म्हणजे आदिपर्वातील काही श्लोकांनुसार महाभारत २४००० श्लोकांचे होते व नंतर संपूर्ण मानवजात, गंधर्व इत्यादी लोकांसाठी त्यात भर घालून ते एक लाख श्लोकांचे बनले. विद्वानांत श्लोकसंख्येवरून अजूनही चर्चा चालू असली तरी सामान्यपणे महाभारताची तीन संस्करणे मानली जातात-
१. जय- ८८०० श्लोक हे व्यासांनी रचले व याचा कथाभाग कौरव-पांडव उत्पत्ती ते भारतीय युद्ध समाप्तीपर्यंत आहे.
२. भारत- पांडवांच्या चौथ्या पिढीत जन्मलेल्या जनमेजयाला पूर्वजांचा इतिहास सविस्तर जाणून घ्यायची इच्छा झाल्याने वैशंपायनाने सांगितला. तो पौरववंशाच्या प्रारंभापासून असल्याने त्यात खूप भर पडली व श्लोकसंख्या ३०००० वर गेली.
३. महाभारत- नैमिषारण्यात एका द्वादशवार्षिक सत्रात म्हणजे बारा वर्षे चालणाऱ्या यज्ञात सौतीने शौनक ऋषींना सांगितले. या वेळी शौनकांनी अनेक प्रस्न विचारले. त्यांची उत्तरे सौती देत गेला व श्लोकसंख्या लाखाच्या घरात गेली. आज उपलब्ध असलेले महाभारत ते हेच.
महाभारत हा कौरव-पांडवांच्या युद्धाचा इतिहास असला तरी त्याच्याबरोबर त्या वेळची समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, आश्रमव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, आध्यात्म, चार पुरुषार्थ, राजनीती असे अनेक विषय असल्यामुळे त्याला पाचवा वेद मानले जाते. राज्याच्या सात अंगांवर फार विस्तृत चर्चा महाभारतात असल्यामुळे त्याला क्षत्रिय वेद असेही म्हटले जाते.
भारतीय समाजरचनेत ऐहिक गोष्टींना तुलनेनी कमी महत्त्व असले तरी त्याला विरोध होता असे मुळीच नव्हे. पारलौकिकाची प्राप्ती करायची तर अध्यात्म हवे पण रिकाम्या पोटी अध्यात्म सुचत नाही, याचेही भान सुटले नव्हते. लौकिक जीवनात अर्थ महत्त्वाचा आहे. समृद्ध आयुष्य जगणे हा मानवाचा अधिकार आहे. फक्त ही समृद्धी कशी मिळवावी याचे नियम असावेत हे महाभारताचे तत्त्व आहे. समाजाला बंधनात ठेवायला राजसत्तेचा अंकुश असणे गरजेचे असते हे व्यासांना माहीत होते. पण ‘यथा राजा तथा प्रजा’ म्हणून हा राजा कसा असावा याचे विस्तृत वर्णन शांतिपर्वात येते. राजा कोणाला म्हणावे ते सांगताना व्यास म्हणतात ‘रञ्जिताश्च प्रजा: सर्वा तेन राजेति कथ्यते’ म्हणजे जो प्रजेला आनंद देतो तो राजा. खरंतर केवळ एका वाक्यात राजाचं कर्तव्य व्यासांनी सांगितलं होतं. पण हे पुरेसं न वाटल्यामुळे की काय व्यास म्हणतात,
यथा ही गर्भिणी हित्वा स्वं प्रियं मनसो नुगम।
गर्भस्य हितमाधत्ते तथा राज्ञाप्यसंशयम। (शांतिपर्व ५६.४५)
(अर्थ- ज्याप्रमाणे गर्भिणी स्त्री स्वत:ला काय आवडतं याचा विचार न करता उदरातील गर्भाचा विचार करते त्या प्रमाणे राजाने वागले पाहिजे.)
राजधर्माचा इतका उच्चतम आदर्श प्राचीन काळी जगात कुठेच सांगितला गेलेला नाही. हा जयाचा इतिहास असल्यामुळे युद्ध, शांतता याची आवश्यकता याचीही चर्चा आहे.
महाभारतातील महत्त्वाचा ग्रंथ ‘भगवद्गीता’, कर्तव्याचं विस्मरण झालेला अर्जुन हा जरी गीतेचं निमित्त असला तरी ही किंकर्तव्यता प्रत्येक माणसाला कधी ना कधी येतेच. अशा वेळी सर्वाना उत्तम मार्गदर्शन देणारा ग्रंथ म्हणजे गीता. कर्म, भक्ती, ज्ञान व योग यांपैकी ज्याला जो मार्ग रुचेल, पचेल तो त्याने स्वीकारावा व नित्य- नैमित्तिक कर्म करता करता मोक्षाची वाट चालावी हा साधा सोपा संदेश गीतेच्याद्वारे व्यासांनी दिल्यामुळेच भगवद्गीता हा जगातला एक उत्कृष्ट ग्रंथ ठरला आहे.
जीवनाच्या जवळजवळ सर्वच अंगांना महाभारताने स्पर्श केल्यामुळेच-
धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च भरतार्षभ।
यदिहास्ति तदन्यत्र यन्न्ोहास्ति तन्न क्वचित।
(अर्थ- धर्म, अर्थ, काम व मोक्ष अशा सर्वच विषयांतील ज्ञान जे इथे आहे तेच सर्वत्र आहे पण जे इथे नाही ते क्वचितच इतरत्र आढळेल.) असे जे म्हटले जाते ते सत्य आहे.
३. पुराणे- महाभारताशिवाय व्यासांनी पुराणांची रचना केली. यासाठी त्यांनी प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या अनेक दंतकथा, लोककथा, आख्याने, उपाख्याने यांचा संग्रह करून पुराणाची एक मूल संहिता तयार केली व आपला शिष्य रोमहर्षणाला दिली. त्याने या मूल संहितेच्या वेगवेगळ्या संहिता तयार केल्या तीच ही अठरा पुराणे होत.
पुरा नवं भवति, पुरा म्हणजे जुनी असूनही जी नवीन भासतात ती पुराणं. पुराणांमध्ये सृष्टीची उत्पत्ती, प्रलय, चौदा विद्या, वेगवेगळ्या राजांची चरित्रे असे विविध विषय आहेत.
व्यासांचा सामाजिक दृष्टिकोन
महाभारताच्या वेळी - समाजात हिंदू, जैन, बुद्ध अशी दरी पडायला सुरुवात झाली होती. राम- कृष्णांसारख्या वंदनीय पुरुषांची निंदा करण्याची प्रथा आली.
बुद्ध धर्मामुळे संन्यास धर्माचे महत्त्व अतोनात वाढले. लोक प्रवृत्तीपेक्षा अकाली निवृत्तीकडे वळू लागले. कर्म करण्यापेक्षा भिक्षेवर उदरनिर्वाह करण्यात धन्यता वाटायला लागली. अशा वेळी गीतेने कर्माचे महत्त्व वाढवले. नकुलाख्यानासारख्या आख्यानांद्वारे जैन धर्मातील अहिंसेला सनातन धर्मातही मानाचे स्थान आहे याची जाणीव करून दिली. अनुगीतेद्वारे बौद्धांच्या संन्यासमार्गाला हिंदू धर्मात सामावून घेतले.
थोडक्यात वेगवेगळ्या संप्रदायांमुळे भारतीय समाजात पडलेली दुही दूर करून समाजाला प्रवृत्तीकडे वळवले.
समाजात लोकवाङ्मय विखुरलेले असते. आजही या लोकवाङ्मयाकडे फारशा आपुलकीने पाहिले जातेच असे नाही. याचा परिणाम म्हणजे समाजातील एक मोठा गट मूळ प्रवाहापासून दूर राहतो. या लोकवाङ्मयाचे संकलन व परिष्करण करणे गरजेचे असते. व्यासांनी या लोकवाङ्मयाचे केवळ संकलन केले असे नव्हे तर पुराणांमध्ये अशा विखुरलेल्या कथांना समाविष्ट करून त्यांना श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून दिला. यामुळे लोकसंस्कृती व नागरसंस्कृतीचे एकीकरण झाले. वेगवेगळ्या जाती, जमाती, समूह यांचा मूळ सांस्कृतिक धारेत समावेश झाला. पुराणांत वेगवेगळ्या तीर्थाचे महत्त्व व त्यांच्या भेटीचे फळ सांगितल्यामुळे तीर्थस्थळांना भेटी द्यायची प्रथा सुरू झाली. त्यामुळे हा निसर्ग सुंदर व पवित्र भारत माझा आहे असा विचार रुजला व भारतीय समाजात एकोपा वाढीस लागला.
कालपरत्वे समाजात, धार्मिक चालीरीतींत अनेक बदल होत असतात हे ओळखून व्यासांनी मूळच्या वैदिक धर्मात आवश्यक ते बदल केले व त्यांचा समावेश पुराणांत करून सर्वत्र प्रसार केला. त्यामुळे मूळ वैदिक धर्माशी असलेली आपली नाळ तुटली नाही. आजही कोणत्याही धार्मिक कार्यारंभी श्रुति- स्मृति पुराणोक्त असे म्हणण्याची पद्धत आहे ती त्यामुळेच. या ठिकाणी मला ग्रीक व रोमन संस्कृतींचे स्मरण होते. प्राचीन काळातील त्याही अशाच अत्यंत प्रगत संस्कृती. पण कालपरत्वे आवश्यक ते बदल त्यांच्यात झाले नाहीत व दोन्ही संस्कृती नामशेष झाल्या, पण वैदिक संस्कृती अशा प्रकारे टिकवून ठेवण्याचे श्रेय व्यासांना जाते. भारतीय परंपरा अक्षुण्ण राखणाऱ्या व्यासांमुळे गुरूपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणून ओळखली जाते.
फ्रान्समध्ये इसवीसनाच्या पंधराव्या शतकात सामाजिक पुनरुज्जीवन झाले. आपल्या इतिहासात असे पहिले पुनरुत्थान व्यासांनी घडवले. जर फ्रान्समधील पुनरुज्जीवन मानवाभोवती केंद्रित होते तर व्यासांनीही मानवाला फार महत्त्वाचे स्थान दिले आहे. म्हणूनच न हि मानुषात। श्रेष्ठतरं हि किंचित। (माणसापेक्षा श्रेष्ठ असे काहीच नाही) असे स्वत: व्यासांनी शांतिपर्वात सांगून ठेवले आहे. मानव व त्याच्या कर्तृत्वाला व्यासांनी केंद्रस्थानी मानले होते. त्यामुळेच शांतिपर्वात व्यास कष्ट करणाऱ्या हातांची अपेक्षा करताना म्हणतात, ज्यांना हात आहेत ते काय करू शकणार नाहीत. ज्यांना हात आहेत ते सिद्धार्थ होत. ज्यांना हात आहेत ते मला अतिशय आवडतात. जशी इतरांना धनाची अपेक्षा असते तशी मला हातांची अपेक्षा आहे. हातांच्या लाभापेक्षा दुसरा अन्य कोणताही लाभ मोठा नाही।
महाभारतकर्त्यां व्यासांच्या क्रांतदर्शित्वाचा हा प्रभाव आहे. त्यांची प्रगल्भता, अनुपमेय बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, कवित्व व या सर्वापेक्षा मानवजातीविषयीचा कळवळा अशा अनेक गुणांमुळेच ज्या ठिकाणी उभे राहून व्याख्यान दिलं जातं त्या स्थानाला व्यासपीठ असं म्हणतात. व्यासपीठावर उभं राहून व्याख्यान देणाऱ्या वक्त्याला व्यासांचे हे आदर्श डोळ्यापुढे ठेवणं बंधनकारक आहे याची जाणीव प्रत्येक वक्त्याने ठेवली पाहिजे.

(हा लेख माझा नसुन. आजच्या लोकसत्ता या पेपर मधे आसावरी बापट यांचा नावावर छापुन आला आहे. हा लेख संग्रही रहावा म्हणुन इथे कॉपी पेस्ट केला आहे.)

रविवार, २५ जुलै, २०१०

सिद्धीगिरी संग्राहलय

कोल्हापुरच्या पुढे बेळगावच्या वाटेवर असेलेल्या सिद्धीगिरी संग्राहलयातील ह्या काहि कलाकृती.
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


श्री स्वामीचरणी विनम्र दंडवत आणि तुम्हां सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः
गुरु साक्षात् परम ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः

शनिवार, २४ जुलै, २०१०

मित्र जीवांचे (???)

धडाकेबाज या पिक्चरमधे एक गाणे आहे "हि दोस्ती तुटायची नाय...."

जीवाभावाचे, एकमेकांसाठी जीव हि देणारे दोस्त खरेच दोस्त असतात का?

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात एकदा तरी असा प्रसंग आलेला असतो जेव्हा आपले कोण आणि परके कोण याची पारख झालेली असते. ज्यांच्याबरोबर काल परवा पर्यंत एका ताटात जेवलेले असतो तेच आज आपल्या वाईट प्रसंगी पाठ फिरवुन गेलेले असतात. ज्यांच्यासाठी नकोत्या कारणासाठी, नको तिथे, नको तेवढे पैसे खर्च केलेले असतात तेच मित्र आज आपल्याला मदत करताना वेगवेगळी कारणे सांगत असतात.

अश्या वाईट प्रसंगी आपल्या घरचेच आपल्यापाठीशी खंबीरपणे उभे राहतात. ज्यांचे बोलणे आपल्याला एकेकाळी कटु वाटत असतात पण त्यांच्याच खांद्यावर डोके ठेवुन मन मोकळे करण्यासाठी आपण आपल्या वाईट प्रसंगी आतुर असतो.

खुप वेळा या मित्रांना खड्ड्यातुन बाहेर काढताना आपणच खड्ड्यात गेलेलो असतो. तरी आपण त्यांना आपले मित्र म्हणवुन घेतो.

हे सर्व लिहायचे कारण की..... कालच माझ्या एका ओळखीच्या मुलाचे लग्न अश्या नालायक मित्रांमुळे पुढे ढकलता ढकलता वाचले.

त्याचे असे झाले की, या येड्याने एकेकाळी मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्ट्याकरण्यासाठी, मैत्रिंणीना फिरवण्यासाठी, जुगाराची आणि बारची बिले भरण्यासाठी मित्रांना सढळ हस्ते खुप मदत केली होती. हा हिरो जेव्हा स्वबळावर लग्न करायला निघाला तेव्हा १००००/- ची मदत (?) करायला हि याचे मित्र तयार नव्हते. आणि मदत कसली खरेतर याचेच पैसे जे अजुन कोणी दिले नव्हते ते परत करायला तयार नव्हते. शेवटी लग्न पुढे ढकलायची वेळ आली तेव्हा याने घरच्यांना खरी कल्पना देवुन वडिलांकडुन पैसे घेतले.

पण नंतर या मुलाने एक गोष्ट खुपच चांगली केली ती म्हणजे घरचे ठाम पाठीशी उभे राहिल्यानंतर सर्वात पहिले काम काय केले तर याने ज्यांना मदत केली होती व त्यांनी आता याला मदत करायची टाळाटाळ केली त्यांच्या बरोबर सरळ संबंध तोडुन टाकले.

या सर्व प्रसंगावरुन मलाच प्रश्न पडला, खरे मित्र खरेच असतात का?

सोमवार, ५ जुलै, २०१०

कात्रज सर्पोद्यान

नुकतेच पुण्याच्या कात्रज सर्पोद्यानला भेट देण्याचा योग आला. अतिशय अप्रतिम उद्दान आहे. - तास कसे गेले हेच समजले नाहि. सर्वांनी आवर्जुन भेट द्यावी असे ठिकाण आहे. पर्यावरणाची पण खुपच छान प्रकारे निगा राखली आहे. प्लास्टीकची बॉटल असेल तर डिपॉझीट घेतले जातेआणि जाताना ते परत करतात. जेणेकरुन लोकांनी आत जावुन प्लास्टीकची बॉटल कोठे हि टाकु नये.(सर्व फोटो मोबाईल कॅमेरा मधुन घेतले आहेत त्यामुळे नीट आले नाहि आहेत. त्या बद्दल क्षमस्व)